पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लघु पाटबंधारेचा घोडसगाव बंधारा तसेच कजगाव, पथराड कालवा दुरुस्तीची कामे प्रलंबित राहिल्याने पावसाळ्यात पिंपळगाव (हरेश्वर), सावखेडा व वरखेडी गावे पाण्याखाली जाण्याची भीती असून यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला आहे.
आमदार किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित रायत यांना या संदर्भात एक पत्र दिले असून यात “पावसाळा आठवड्याभरावर आला असतांना देखील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाचोरा मतदार संघातील लघु पाटबंधारेचा घोडसगाव बंधारा तसेच भडगाव तालुक्यातील कजगाव, पथराड कालवा यांचे दुरुस्तीचे कामे प्रलंबित राहिल्यामुळे आगामी पावसाळ्यात पिंपळगाव (हरेश्वर), सावखेडा व वरखेडी गावाला धोका निर्माण होऊन कालवा गावे पाण्याखाली जाण्याची भीती लक्षात घेता या विषयांची तातडीने सोडवणूक न झाल्यास आपण उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, “मागील २०२१ च्या झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघातील घोडसगाव तलाव, कजगाव, पथराड कालवा आदी व धरणांची भिंत व इतर भाग क्षतीग्रस्त झालेला आहे. महापुरामुळे घोडसगाव तलावाच्या खालील भाग पिंपळगाव (हरेश्वर), सावखेडा, वरखेडी आदी गावांना धोका निर्माण झालेला होता. तसेच तीतूर नदीला आलेल्या महापुरामुळे कजगाव बंधाऱ्याच्या डाव्या कडील भागाने पाण्याने मार्ग बदल्याने भराव वाहून गेला. तसेच (डी. एस.) भिंत पडून गेली. पथराड कालवा देखील फुटून गेला. या सर्व गंभीर परिस्थिती बाबत दि. ४ मे २०२२ रोजी अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सदर तलावाचे व बंधाऱ्याचे कामे तातडीने दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासित केले मात्र पावसाळा हप्ताभरावर येऊन ठेपला आहे. तरी प्रशासनाने गांभीर्याने त्याची दखल घेतली नाही.
भविष्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर), सावखेडा, वरखेडी, कोळगाव, पथराड, घुसर्डी, दिघी आदी गावांना प्रचंड प्रमाणावर धोका निर्माण होईल शेतीचे पिकांचे तथा जीवित हानी देखील होऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील जलसंपदामंत्री यांच्याशी वारंवार बैठका घेऊन गंभीर व भयावह परिस्थिती लक्षात आणून दिलेली आहे. तरी वरील तलाव घोडसगाव, कजगाव बंधारा, पथराड बंधारा आदी तातडीने दुरुस्तीची कामे दि. २१ मे पर्यंत सुरू करण्यात यावे. अन्यथा जनहितासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला आहे.