मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून महायुतीचा विजय मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपावरून ते 23 जानेवारी रोजी दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांकडून समजते. आपल्या राजीनामा पत्रात, माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीने जाहीर करून, बॅलेट पेपर किंवा व्हीव्हीपॅटच्या पद्धतीने घेतली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता उत्तम जानकर 22 जानेवारीला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आगामी आंदोलन आणि ईव्हीएम विरोधात दिल्लीत आंदोलन करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. आंदोलनासंबंधी बोलताना उत्तम जानकर म्हणाले, “ईव्हीएम विरोधात मारकडवाडीत उठाव झाला, आणि तेच वातावरण राज्यभरात आहे. आगामी दिल्ली आणि गोव्याच्या निवडणुका लक्षात घेता, आम्ही चोर कुठे पकडायचा, यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं तरी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्याशी मी भेटलो, आणि आगामी आंदोलनाची दिशा ठरवू.”
उत्तम जानकर यांनी आपल्या राजकीय संघर्षावर भाष्य करत, “ईव्हीएमच्या जिवावर निवडणूक जिंकणे हा राष्ट्रद्रोह आहे,” असे ठाम मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेचे समर्थन घेतले आणि लढाई देशासाठी असल्याचे सांगितले. याशिवाय, 25 जानेवारीला निवडणूक आयोगाच्या स्थापन दिवसाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी सुरु आहे. आता सर्वांच्या भेटीगाठी घेऊन पुढचे धोरण ठरवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.