

हिंगोली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली असून काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार डॉ. प्रज्ञा सातव या भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज दि. १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे त्या अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त असून, यामुळे राज्याच्या राजकारणात तसेच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी असून सातव कुटुंब हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे मानले जाते. या घराण्याने अनेक वर्षे काँग्रेससाठी निष्ठेने काम केले असून प्रज्ञा सातव या विधान परिषदेतील सदस्य म्हणून काँग्रेसकडून दोन टर्म आमदार राहिल्या आहेत. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या.
मात्र अलीकडच्या काळात काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे डॉ. प्रज्ञा सातव या नाराज असल्याचे संकेत मिळत होते. पक्षातील काही निर्णयप्रक्रिया, संघटनात्मक बदल आणि नेतृत्वाशी असलेले मतभेद यामुळे त्या अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.
या घडामोडींविषयी आमदार प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरीही त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. गुरुवारी मुंबई येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या संभाव्य प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली आणि आसपासच्या भागातील त्यांचे समर्थक व कार्यकर्ते बुधवारीच मुंबईकडे रवाना होत आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने हा प्रवेश भाजपसाठी शक्तिप्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार आहे.
दरम्यान, या विषयावर काँग्रेस पक्षाने सावध प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या वृत्ताचे खंडन करत सांगितले की, काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आमदारकी दिली असून त्या असा कोणताही टोकाचा निर्णय घेतील असे वाटत नाही. ही बातमी तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून पक्ष त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्याशी संवाद सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एकीकडे भाजप प्रवेशाची चर्चा आणि दुसरीकडे काँग्रेसकडून त्याचे खंडन सुरू असले तरी, प्रज्ञा सातव यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भूमिकेवर पुढील राजकीय हालचाली अवलंबून राहणार असून हिंगोलीच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.



