भाजप वापसीच्या चर्चांमध्ये एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’ : भूमिकेकडे लागले लक्ष !

मुक्ताईनगर-पंकज कपले ( एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट ) | माजी मंत्री तथा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची भारतीय जनता पक्षात घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच ते नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात खडसे कुटुंबाकडून अद्यापही कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया न आल्याने हा सस्पेन्स वाढला आहे.

आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांचे कुटुंबिय सध्या गोत्यात सापडले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील त्यांच्या मालकीच्या जमीनीतून अवैध गौणखनिज उत्खनन केल्याच्या आरोपातून त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना तब्बल १३७ कोटी रूपयांचा दंड झाला आहे. हा दंड न भरल्याने त्यांच्या सुमारे ४९ कोटी रूपयांचे रेडी रेकनर दर असलेल्या मालमत्तेवर बोजे देखील बसविण्यात आल्याची माहिती भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. यासोबत जिल्हा दुध संघातील भरती प्रक्रियेत दाखल गुन्ह्याचे तार खडसे कुटुंबापर्यंत पोहचवण्याच्या हालचाली देखील गतीमान झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे एकूणच खडसे कुटुंब हे अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या सर्व पार्श्‍वभूमिवर, एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करणार असल्याची चर्चा तशी काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला असला तरी मोदी-शाहांनी अद्याप हिरवा झेंडा न दाखविल्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला असल्याची चर्चा देखील सुरू होती. तथापि, गेल्या काही दिवसांपासून विशेष करून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीची मालकी ही अजित पवार गटाकडे असल्याचा निर्णय दिल्यापासून आमदार एकनाथ खडसे हे कोणत्याही जाहीर कार्यक्रमात दिसले नसून ते प्रसारमाध्यमांच्या समोर देखील आले नाहीत.

लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने गेल्या पाच दिवसांपासून आ. एकनाथ खडसे, खा. रक्षाताई खडसे, रोहिणीताई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असला तरी संपर्क झाला नाही. त्यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांच्याशी आज सकाळी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, राजकारणात काहीही शक्य असले तरी भाऊंचा भाजप प्रवेश होणार नाही. तर मतदारसंघातील नाथाभाऊ समर्थकांमध्ये मात्र आमदार खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर काही कार्यकर्त्यांनी भाऊ पुन्हा भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, राजकीय क्षेत्रातील सुत्रांच्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे पुन्हा भारतीय जनता पक्षात येण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप आणि संघातील एक गट हा एकनाथ खडसे यांच्याबाबत सहानुभुती असणारा आहे. याच गटाच्या मदतीने त्यांनी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत सर्वांनी चुप्पी साधली असतांना राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, एकनाथ खडसेंचे भाजपमध्ये येण्यासाठी खूप निरोप येत आहेत. त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी याबाबत मला कोणतीही माहिती नाही ! तसेच, खडसेंचे वरपर्यंत संबंध असल्याने ते तेथून प्रयत्न करत असल्याचा टोला देखील गिरीश महाजन यांनी आज मारला. त्यांच्या वक्तव्याने एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी वरिष्ठांनी संमती दिल्याची चर्चा असली तरी यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. प्राप्त माहितीनुसार आमदार एकनाथ खडसेंनी विनाशर्त भाजपमध्ये यावे. तसेच त्यांच्यासह कुटुंबियांना निवडणुकीच्या तिकिटांबाबत कोणताही शब्द मिळणार नाही या अटी टाकण्यात आल्या असून याच्या बदल्यात त्यांना त्यांच्यावरील सर्व संकटातून बाहेर काढतांनाच त्यांच्या सन्मानजनक सेवानिवृत्तीची तजवीज करण्यात येईल ! असा शब्द देण्यात आल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. आपली भाजपमधील ‘घरवापसी’ ही दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत व्हावी असा आ. एकनाथ खडसे यांचा आग्रह असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.

या संदर्भात, लाईव्ह ट्रेंडस न्यूज एकनाथ खडसे वा त्यांच्या कुटुंबियांच्या अधिकृत प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत असून ती मिळाल्यावर आम्ही लागलीच आपल्याला अपडेट करू.

खालील व्हिडीओत पहा नाथाभाऊंच्या कथित भाजप प्रवेशाबाबत गिरीशभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1772028466615413

Protected Content