मुंबई | मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे मराठा भवन बांधण्यात यावं यासह मुक्ताईनगर येथे पायाभूत व मूलभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त होणेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या करोडोच्या घरात आहे. राज्याची राजधानी मुंबई येथे दररोज राज्यभरातून मराठा समाजातील हजारो नागरिक आरोग्य, शैक्षणिक, महसूल, प्रशासकिय व मंत्रालयीन कामकाजानिमित्त मुंबई येथे ये जा करावी लागते. त्यातच मुंबई येथे राहण्याची व मुक्कामाची सुविधा नसल्याने नागरिकांना दररोज लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांतर्फे मुंबई येथे मराठा भवन बांधण्यात यावे. अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे.
या मागणीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे मुंबई येथे मराठा भवन साठी जागा व निधीची तरतूद करावी; तसेच मुक्ताईनगर नगर मतदार संघातील सावदा, बोदवड व मुक्ताईनगर नागरी हद्दीत तसेच ग्रामीण भागात पायाभूत व मूलभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त होणेसाठी विविध लेखी पत्राद्वारे मागण्या केल्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मागणीच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत. यावेळी उपसभापती नरहरी झिरवाळ , माजी मंत्री दादा भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय कुटे आदींची उपस्थिती होती.