मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘माझी लाडकी बहीण योजना याविषयी विविध शंका कुशंका तसेच करण्यात येणारी कार्यवाही या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुक्ताईनगर येथील प्रभाग क्रमांक 17 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहांमध्ये मार्गदर्शनपर शिबीर व कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत पाटील तर प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार गिरीश वखारे, गटविकास अधिकारी निशा जाधव, संजय गांधी निराधार योजनेची समितीचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, नायब तहसीलदार निकेतन वाडे, महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी संपदा संत, सुनील पाटील, प्रवीण चौधरी हे प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी नारीशक्ती ॲप डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक निर्णय या संदर्भात घेतला असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अर्ज भरण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले यासाठी शासन विशेष असा भत्ता सेविकांना देणार असल्याचेही सांगितले. संजय गांधी निराधार योजनेचे अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना याचे फॉर्म भरता येणार नाही, पी एम किसान व सीएम किसान योजना म्हणून प्रति वर्ष 12 हजार रुपये महिलांना मिळत असतात त्या महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेतील फरकाचे सहा हजार रुपये मिळतील असे सांगत आधार कार्ड व बँक खाते हे लिंक करण्यात यावे तसेच ओटीपीच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरताना खबरदारी घेण्यात यावी जेणेकरून महिलांची आर्थिक फसवणूक होणार नाही असे निर्देशही आमदारांनी याप्रसंगी दिले. यापुढे विभागनिहाय तालुक्याचा शिबिर घेण्यात येणार आहे पहिले शिबिर हे कुऱ्हा येथे मंगळवारी घेण्यात येणार असून याप्रसंगी अर्ज हे प्रशासनातर्फे पुरवण्यात येणार असून अंगणवाडी सेविकांनी गावात जाऊन हे अर्ज भरायचे आहे व या संदर्भात काही अडचण असेल तर आपले कार्यकर्ते मदत करतील असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रसंगी सांगितले. याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी आपल्या शंका विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले व त्याचे निरसन आमदार तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.महिलांनी अंगणवाडी सेविकांना बैठक घेण्यासाठी जागा नसल्याने हॉल बांधून देण्याची मागणी केली तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ जागा उपलब्ध झाल्यानंतर हॉल बांधून देणार असल्याचे जाहीर केले.