अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार अनिल पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारचा निषेध करतांना केलेली वेशभूषा ही चर्चेचा विषय ठरली.
गेल्या अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारवर ५० खोके एकदम ओक्केचा हल्लाबोल करण्यात फ्रंट लाईन वर राहणारे अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुंबईत सुरू असलेल्या बजेट अधिवेशनात देखील कांदा व कापूस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी विधिमंडळात लक्षवेधी प्रवेश करून जोरदार हल्लाबोल केला.
याप्रसंगी आमदार अनिल पाटील अंगावर कापूस कांदा परिधान करून जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्वांचेच लक्ष त्यांनी वेधून घेतले.’सरकार प्रचारात व्यस्त’, ’कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त’, ’शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो’, ’कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ’कापसाला भाव मिळालाच पाहिजे’, ’हरभर्याला भाव मिळालाच पाहिजे’, ’दोन रुपयाचा चेक देणार्या सरकारचा निषेध असो’, ’शेतकर्यांची चेष्टा करणार्या सरकारचा निषेध असो’, ’गद्दार सरकार जोमात…शेतकरी मात्र कोमात’, ’कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी काल विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनात आमदार अनिल पाटील चांगलेच आक्रमक असल्याने अनेक वृत्त वाहिन्यांनी देखील याची दखल घेतली.
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकर्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकर्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने कापसासाठी निर्यात धोरण तयार करावे व कांद्याला योग्य हमी भाव मिळायला द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी यावेळी केली.
शेतकर्यांसाठी सदैव आक्रमक राहणार-आ अनिल पाटील
या आंदोलनासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असून शेतकर्यांच्या व्यथा काय असतात याची जाण मला आहे,कापूस कांदा सह अन्य पिकाला कवडीमोल भाव असल्याने शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे, असे असताना हे सरकार शेतकर्यांना दिलासा मिळेल असे कोणतेही निर्णय घेत नसल्याने शेतकर्यांनी करावे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रश्नी शेतकरी किती संतप्त झाला आहे हेच आजच्या आंदोलनातून शासनाला दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला असून ज्या ज्या वेळी शेतकरी हिताचा प्रश्न येईल त्या त्या वेळी असाच आक्रमकपणा या शासनाला आमच्यात दिसेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.