यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समिती कार्यालयात यावल–रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट देत प्रशासनाची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. कार्यालयीन वेळेतच गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड गैरहजर असल्याचे उघड झाले असून त्यांच्या अनुपस्थितीबाबत कोणताही रजेचा अर्ज किंवा अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण पंचायत समितीतील कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आमदार जावळे यांनी केलेल्या या अचानक तपासणीत केवळ गटविकास अधिकारीच नव्हे, तर विविध विभागांतील अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर अनुपस्थित असल्याचे दिसून आले. जनतेच्या दैनंदिन कामांशी थेट संबंधित असलेल्या कार्यालयात अशी बेपर्वाई सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “जनतेची कामे प्रलंबित ठेवून अधिकारी बेपत्ता राहणार असतील, तर हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

स्थानिक नागरिकांकडून गटविकास अधिकारी नियमितपणे कार्यालयात गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याचे आमदारांनी यावेळी नमूद केले. प्रशासनातील ही बेजबाबदार आणि बेशिस्त कार्यपद्धती थेट ग्रामीण विकासाच्या कामांवर परिणाम करणारी असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले.
या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याशी थेट संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. गटविकास अधिकारी तसेच इतर गैरहजर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.
या अचानक झालेल्या तपासणीमुळे पंचायत समितीतील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयातच अधिकारी उपलब्ध नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी आपली कामे व तक्रारी कुणाकडे मांडाव्यात, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पंचायत समिती बेशिस्तीचे व भ्रष्टाचाराचे माहेरघर बनत चालल्याची तीव्र प्रतिक्रिया यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.



