यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भालोद येथील शाळेच्या तब्बल एकशे तीन वर्षे जुन्या आणि महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव पूर्ण केलेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची धुरा हेमलताताई इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली असून या माध्यमातून आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी नवरात्रोत्सवात खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा सन्मान केल्याचे दिसून येत आहे.
भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटी ही परिसरातील एक ख्यातप्राप्त अशी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. दिवंगत मधुकरराव चौधरी, जे. टी. महाजन, हरीभाऊ जावळे यांच्यासारख्या नेत्यांनी या संस्थेच्या प्रगतीत भर टाकली आहे. या संस्थेला तब्बल एकशे तीन वर्षांचा इतिहास आहे. तर, स्व. हरीभाऊ जावळे यांनी महाविद्यालय सुरू करून त्याला देखील पंचवीस वर्षे झाली आहेत. या संस्थेतून शिकून गेलेले हजारो विद्यार्थी व विद्यार्थीनी हे ठिकठिकाणी विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. यावल तालुक्यासह परिसरातील शैक्षणिक क्रांतीत या शाळेचे मोलाचे योगदान आहे. लक्षणीय बाब म्हणजे बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजेच ‘केजी टू पीजी’ असे शिक्षण येथे उपलब्ध आहे.

अलीकडेच भालोदच्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीची निवडणूक आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकाराने बिनविरोध पार पडली होती. यानंतर आज चेअरमनपदाची निवड करण्यात आली. यात हेमलता इंगळे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अतिशय प्रतिष्ठित अशा या संस्थेची धुरा आता महिलेकडे सोपविण्यात आली असून या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. नवरात्रोत्सव संपत असतांनाच आमदार अमोल जावळे यांनी महिलेच्या हाती ही संस्था सोपवून समाजाला एक अतिशय सकारात्मक असा संदेश दिला आहे. आजवर शाळेच्या मुख्याध्यापिक वा महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून महिलांनी सक्षमपणे काम पाहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. तथापि, शतकोत्तर परंपरा असणाऱ्या संस्थेची सूत्रे महिलेकडे आल्याचे हे पहिलेच उदाहरण मानले जात आहे.
या संदर्भात आमदार अमोल जावळे म्हणाले की, ”सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमनपदी हेमलता इंगळे यांची झालेली निवड हा मातृशक्तीचा खरा सन्मान आहे. पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने महिलांच्या सबलीकरणावर भर दिला आहे. अगदी बेटी बचाओ-बेटी पढाओ पासून ते सध्या सुरू असलेल्या नारीशक्ती अभियानापर्यंत त्यांनी महिलांना प्राधान्य दिले आहे. याचमुळे चेअरमनपदासाठी अन्य अनेक पर्याय असतांना सुध्दा हेमलताताई इंगळे यांच्यासारख्या कर्तबगार महिलेच्या हाती ही ऐतीहासीक संस्था देण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे. त्या संस्थेला अजून नवीन शिखरावर घेऊन जातील यात आम्हाला शंकाच नाही. आणि आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी आहोत.”



