Home प्रशासन धनाजी नाना महाविद्यालयात ‘मियावाकी घनवन प्रकल्पा’चा शुभारंभ; पर्यावरणाच्या संवर्धनावर भर

धनाजी नाना महाविद्यालयात ‘मियावाकी घनवन प्रकल्पा’चा शुभारंभ; पर्यावरणाच्या संवर्धनावर भर


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील धनाजी नाना महाविद्यालयात, लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त एका महत्त्वपूर्ण ‘मियावाकी घनवन प्रकल्पा’चे वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याचा उद्देश पर्यावरणाचे संवर्धन करणे हा आहे.

या समारंभाचे अध्यक्षस्थान तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूरचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांनी भूषवले, तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. श्री. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी मियावाकी घनवन प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पासाठी विद्यापीठाने ५० हजार रुपये, संस्थेने १ एकर जागा, तर मा. शिरीषदादा चौधरी यांनी ५१ हजार रुपये मदत केली. तसेच, धनाजी नाना महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ७५ हजार रुपयांचा निधी दिला. या प्रकल्पासाठी यावल पूर्व वनविभाग, यावल यांनी ६०० रोपे उपलब्ध करून दिली आहेत. या रोपांमध्ये सातपुड्याच्या जंगलात आढळणाऱ्या भारतीय प्रजातीच्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे, जसे की अर्जुन, बेहडा, बाभूळ, लिंब, अमलताश, बदाम, पिंपळ, मोह, करंजी, खैर, कवट इत्यादी.

याप्रसंगी हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक या संस्थेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. नाना पाटील सर, भुसावळ यांनी ‘हिरवांकुर’ ही पुस्तिका मा. शिरीषदादा चौधरी आणि मा. कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी यांना भेट दिली. सोबतच, रक्षा व अस्थी विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष लावण्याचे आणि विविध प्रसंगी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मा. कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी यांनी आपल्या मनोगतात मियावाकी घनवन प्रकल्पामुळे परिसरातील तापमानात लक्षणीय घट होईल, तसेच परिसरातील लोकांचे आरोग्य व आहारात सुधारणा होण्यास मदत होईल, असे नमूद केले. भारतातील अनेक प्रदूषित शहरांमध्ये लोकांचे आरोग्य सरासरी तीन वर्षांनी कमी होत आहे, यावर “झाडे लावा, झाडे जगवा” हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना मा. शिरीषदादा चौधरी यांनी स्व. मधुकरराव चौधरी यांच्या ‘हिरवा सातपुडा’ या संकल्पनेची आठवण करून दिली. त्यासाठी त्यांनी सातपुडा विकास मंडळाची स्थापना केली, आणि पुढे दर्जेदार शिक्षणासाठी जनता शिक्षण मंडळासोबत काम केले. निसर्गरम्य ठिकाणी विद्यादान उत्तम होते, असे मधुकरराव चौधरी मानत असत, अशी आठवण शिरीषदादांनी सांगितली. सर्वांच्या सहकार्याने हा मियावाकी घनवन प्रकल्प उत्तमपणे राबवून त्याचे व्यवस्थित संगोपन करून परिसरात आदर्श निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद शंकर वाघुळदे, सचिव प्रा. मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव प्रा. नंदकुमार आसाराम भंगाळे, सदस्य डॉ. शशिकांत सदाशिव पाटील, सदस्य श्री. संजय काशिनाथ चौधरी, हिरवांकुर संस्थेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. नाना पाटील, प्राचार्या डॉ. अरूणाताई चौधरी, युवानेते मा. धनंजयभाऊ चौधरी, मा. अजितदादा पाटील, मा. झांबरे सर, मा. झोपे सर, तसेच धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य डॉ. राजेश यादव चौधरी, प्राचार्य डॉ. रवींद्र एल चौधरी, प्राचार्या लता मोरे, प्राचार्य डॉ. सी.पी. लभाणे, मधुस्नेह परिवारातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.आर. राजपूत व डॉ. सीमा बारी यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. हरीष नेमाडे, डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, प्राध्यापक, वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे, के.एल. धनगर, नितीन दादा, प्रा. शिवाजी मगर, प्रा. मंदार बामणोदकर, श्री. संतोष तायडे, शिक्षकेतर कर्मचारी, एन.सी.सी, एन.एस.एस. आणि दामाधर नाना प्रबोधिनीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound