जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेशी संबंधित बनावट दस्तऐवज व बनावट कागदपत्रे बनवून खरे भासवून वारंवार गैरवापर करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व इतर शासकीय कार्यालयात वापर करून दिशाभूल करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १४ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात निलेश रणजित भोईट वय ४५ रा. भोईटे नगर, पिंप्राळा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी विजय भास्कर पाटील वय ५५ रा. जळगाव यांच्यासह इतरांनी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेशी संबंधित बनावट दस्तऐवज व बनावट कागदपत्रे बनवून खरे भासविले आहे. त्यामुळे या बनावट कागदत्रांचा आधारे शासकीय कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेत वापर करून शासनाची फसवणूक केला आहे. हा प्रकार ०२ डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान घडला आहे. असे फिर्यादीत नमुद आहे. या फिर्यादीवरून विजय भास्कर पाटील वय-५५ रा. जळगाव याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख हे करीत आहे.