मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात ५ तारखेच्या रात्री महिला कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यासोबत एका तरुणाने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने त्यांच्या अंगावरून हात फिरवून असभ्य वर्तन केले, असा आरोप असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदन
या गंभीर घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन सादर करण्यात आले. आरोपी तरुण एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समजते, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणी
हा सर्व प्रकार उपजिल्हा रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषी तरुणावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अशा घटनांमुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी
निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, राजेंद्र माळी, अतुल पाटील, अमीन खान, बापू ससाणे, प्रवीण पाटील, नंदू हिरोळे, दशरथ कांडेलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेचा निषेध करत त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन-प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली.



