Home Cities एरंडोल गौण खनिजाची लूट; वरखेडी शिवारातील नैसर्गिक डोंगर जेसीबीने पोखरले!

गौण खनिजाची लूट; वरखेडी शिवारातील नैसर्गिक डोंगर जेसीबीने पोखरले!


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात निसर्गसंपदेची उघडमाथा लूट सुरू असून, रस्ते बांधकामाच्या नावाखाली नैसर्गिक डोंगरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने हजारो ब्रास गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक केली जात आहे. या संपूर्ण प्रकाराकडे एरंडोल महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

विनापरवाना ‘डोंगर’ तस्करी :
मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी रोडवरील शिवारात एका खाजगी ठेकेदाराने रस्ता कामाच्या नावाखाली नैसर्गिक डोंगर पोखरण्यास सुरुवात केली आहे. नियमानुसार डोंगर उत्खननासाठी शासनाची विशेष परवानगी आणि रॉयल्टी भरणे आवश्यक असते. मात्र, येथे कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता दिवसरात्र जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन सुरू आहे. या ठिकाणाहून दररोज शेकडो डंपर गौण खनिजाची तस्करी होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

प्रशासनाची भूमिका संशयास्पद? :
या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी एरंडोल तहसीलदारांकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, तक्रारी देऊनही महसूल विभागाने अद्याप साधी पाहणीदेखील केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच हा डोंगर गिळंकृत केला जात आहे का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

प्रांताधिकाऱ्यांकडून चौकशीचे आश्वासन :
या संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने एरंडोलचे प्रांताधिकारी प्रविण गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. वरखेडी शिवारातील डोंगर उत्खननाबाबत संपूर्ण माहिती मागवून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


Protected Content

Play sound