
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रेल्वेच्या तिकीटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या संदर्भात निवडणूक आयोगाने दखल घेतल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मोदींचा फोटो असलेले तिकीट परत मागवले होते. परंतु, पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाने आचारसंहितेचा भंग करण्यास सुरुवात केली आहे. यावरून रेल्वे मंत्रालय निवडणूक आयोगाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाने प्रचारात भारतीय सैन्याचा उल्लेख करू नका सांगूनही पंतप्रधान मोदी सैन्याच्या नावावर मत मागतात, त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासन आचार संहितेचा भंग करत मोदींचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना देत आहे. लखनौपासून ३० किमी अंतरावर असलेल्या बाराबंकी शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने रविवारी रेल्वेचे तिकीट काढले असता त्यावर मोदींचा फोटो होता, तसेच सरकारी योजनेची माहिती देण्यात आली होती. या संदर्भात मोहम्मद शब्बीर यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार कऱण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमदाटी करून पिटाळून लावण्यात आले.तर चुकून मोदींचा फोटो असलेले तिकीट मशिनमध्ये लावल्याचे सांगण्यात आल्याचा खुलासा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.