Home Cities जळगाव अजितदादांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली; बारामतीत कुटुंबीयांची भेट

अजितदादांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली; बारामतीत कुटुंबीयांची भेट


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बारामती येथे जाऊन त्यांच्या पार्थिवास श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या या भेटीदरम्यान राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अधोरेखित झाली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बारामती येथील निवासस्थानी भेट देत अजितदादा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी अत्यंत भावनिक वातावरणात श्रद्धांजली अर्पण करत दिवंगत नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.

यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजितदादांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत राज्याच्या राजकारणात तसेच सार्वजनिक जीवनात अजित पवार यांचे योगदान अतुलनीय असल्याचे नमूद केले. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या विकासदृष्टीला मोठा धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अजितदादा यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रशासन, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास यांसारख्या विविध क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केली होती. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे ते जनसामान्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या कार्याचा ठसा राज्याच्या राजकीय इतिहासात कायम राहील, असे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.

 


Protected Content

Play sound