मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कालच मंत्रीपदाची शपथ घेतलेले ना. अनिल भाईदास पाटील यांच्याकडे अजित पवार यांनी पुन्हा एकदा प्रतोद पदाची जबाबदारी सोपविली आहे.
आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने प्रतोदपदाची जबाबदारी सोपविली होती. ते अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक असून २०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीच्या कालावधीत देखील ते दादांसोबतच होते. याचेच फळ म्हणून महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाने प्रतोदपद सोपविले होते.
कालच अनिल भाईदास पाटील यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रतोद बनविण्यात आले आहे. आज मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती जाहीर केली. या माध्यमातून मंत्रीपदाच्या पाठोपाठ त्यांच्याकडे पक्षातील देखील अतिशय महत्वाचे पद आल्याचे मानले जात आहे.
कोणत्याही पक्षासाठी प्रतोद हे पद अतिशय महत्वाचे असते. पक्षाच्या वतीने व्हिप काढण्याची जबाबदारी ही संबंधीत प्रतोद यांच्याकडेच असते. याचा विचार केला असता अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील एक अतिशय महत्वाची जबाबदारी अनिल भाईदास पाटील यांच्याकडे सोपविल्याचे दिसून येत आहे.