मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर नवीन खनिज तेलसाठे आढळले आहेत. या संशोधनामुळे भारताच्या तेल उत्पादनात चार पट वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या शोधाला अधिकृत दुजोरा दिला असून, लवकरच या भागात उत्खनन कार्य सुरू होणार आहे.
गेल्या आठ वर्षांपासून या क्षेत्रात तेलसाठ्यांसंदर्भात संशोधन सुरू होते. आता केंद्रीय तेल उत्पादन कंपन्यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू समुद्रात 5,338 चौरस किमी आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13,131 चौरस किमी क्षेत्रावर हे तेलसाठे आढळल्याचे स्पष्ट केले आहे. एकूण 18 हजार चौरस किमी पेक्षा जास्त क्षेत्रात हे तेलसाठे आढळल्याने भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी ही मोठी संधी आहे.
विशेष म्हणजे, 2017 मध्ये सापडलेल्या तेलसाठ्यांच्या तुलनेत यावेळी आढळलेले साठे अधिक मोठे असल्याने भारताच्या तेल उत्पादनात चौपट वाढ होऊ शकते. यामुळे देशाच्या इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. या नव्या तेलसाठ्यांमुळे केवळ भारताच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे, तर स्थानिक उद्योगांनाही मोठा फायदा होणार आहे. कोकणातील डहाणू आणि मालवण या भागांत तेल उत्खनन प्रकल्प सुरू झाल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेलाही वेग येईल.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या शोधाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून, लवकरच उत्खनन कार्य सुरू होणार आहे. हे तेलसाठे देशाला इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी हे एक मोठे पाऊल ठरणार आहे.