अकोला-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अकोट नगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी झालेल्या भाजप–MIM जवळिकीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच आता ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीनकडून भाजपला मोठा धक्का देणारी भूमिका समोर आली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट शब्दांत सांगत भारतीय जनता पार्टीसोबत कुठल्याही परिस्थितीत युती होणार नाही, तसेच भाजपसोबत आम्ही बसणार नाही, अशी ठाम भूमिका जाहीर केली आहे.
अकोल्यातील राजकीय प्रयोग नवे नसले तरी अकोटमधील सत्तासमीकरणांनी राज्यभर चर्चेला उधाण आणले आहे. अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी थेट MIMसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे भाजपवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी आम्ही भाजपसोबत जाणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करत या युतीपासून पक्ष स्वतःला दूर ठेवत असल्याचे सांगितले.

इम्तियाज जलील म्हणाले की, अकोटमध्ये ‘विकास मंच’ नावाची आघाडी स्थानिक पातळीवर स्थापन करण्यात आली होती आणि विकास व्हावा या उद्देशाने तेथील काही पदाधिकारी भाजपसोबत गेले असावेत. मात्र अशा आघाडीत सहभागी होणे पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत नाही. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांना त्या आघाडीतून तात्काळ बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपसोबत कुठेही युती होणार नाही, हे आम्ही स्पष्टपणे सांगतो, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
पुढे बोलताना जलील यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. विकास झाला नाही तरी चालेल, तो आमच्यासाठी दुय्यम मुद्दा आहे; मात्र समाजात जाती-जातींमध्ये भांडण लावणे आणि तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि अशा पक्षासोबत आम्ही जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात विरोध असतोच, पण त्याला सामाजिक सलोखा भंग करणारी दिशा आम्ही कधीही स्वीकारणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अकोटमधील उमेदवारांबाबत स्पष्टीकरण देताना इम्तियाज जलील म्हणाले की, आमचे कुठलेही उमेदवार पक्ष सोडून गेलेले नाहीत. त्यांनी निर्णय घेतण्यापूर्वी पक्ष नेतृत्वाला विश्वासात घेतले नाही, ही त्यांची चूक आहे. शिवसेना, बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती आणि इतर पक्षही त्या आघाडीत सहभागी झाले आहेत, मात्र MIM भाजपसोबत जाणार नाही. विकास नाही झाला तरी चालेल, ही आमची भूमिका कायम आहे, असे त्यांनी पुन्हा ठामपणे सांगितले.
अकोट नगरपालिकेतील निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तासमीकरणांमुळे ‘अकोट पॅटर्न’ची राज्यभर चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. ३३ सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला ११ जागा मिळाल्या, तर MIM ५ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भाजपने बहुमतासाठी ‘अकोट विकास मंच’ स्थापन करत दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्तीच्या नगरसेवकांना सोबत घेतले. या मंचाकडे २५ सदस्य असून, नगराध्यक्षासह सत्ताधारी गटाची संख्या २६ झाली आहे. काँग्रेसचे ६ आणि वंचित बहुजन आघाडीचे २ सदस्य विरोधी बाकांवर बसले आहेत.



