दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये तर शासनाकडून ५ रूपये अनुदान मिळणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये तर शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात ही घोषणा केली. नवे दर १ जुलै पासून राज्यभर लागू केले जातील, असे स्पष्ट करत दुध भुकटीसाठी प्रति किलो ३० रूपये अनुदान देणार असल्याची घोषणाही विखे यांनी केली आहे.

दुधाच्या दरावरून शेतकरी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि दुधाचे दर निश्चित करण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधी,दूध उत्पादन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तसेच पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अधिकारी, आमदार शिवाजीराव कर्डिले, सदाभाऊ खोत, आमदार विनय कोरे, आमदार मंगेश चव्हाण तसेच एनडीडीबीचे व्यवस्थापकिय संचालक अनिल हातेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत दूध दरासंबधीच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला आहे. दर गडगडल्याने राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी चिंतेत होता. यावर या बैठकीत तोडगा काढला आहे.

मंत्री विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या विचारत घेत राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये दर देण्याचे सर्वानुमते निश्चित केल्याचे सांगितले. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यास ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर ३५ रुपये मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, असे विखे पाटील म्हणाले. सदरचे दर १ जुलै पासून राज्यभर लागू केले जातील, तसेच दुध भुकटीसाठी प्रति किलो ३० रूपये अनुदान देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सध्या सहकारी दूध संघ आणि खासगी दूध संघाकडून प्रतिदिन साधारण १ कोटी ६२ लाख ८० हजार लिटर दूध संकलन होते. दुधाची गरज पूर्ण झाल्यावर अतिरिक्त दूध भुकटी तथा बटर बनविण्यासाठी वापरले जाते. भुकटी व बटर प्रकल्पांनाही नुकसान होणार नाही, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Protected Content