मुंबई (वृत्तसंस्था) दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाने मिलिंद देवरा यांना दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठविली होती. जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजवल्याचे विधान त्यांनी एका भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि १७१ आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल भादंवि १२५ या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मिलिंद देवरा यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढल्या आहेत. दक्षिण मुंबईत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. दक्षिण मुंबईत जैन समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. यामुळे यामुळे सेनेच्या वतीने अॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी ८ एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. सोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवली होती. या भाषणाच्या क्लिपमध्ये प्रथमदर्शनी देवरा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून येत असल्याची नोंद निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती.