Home क्राईम रिक्षात बसू नको म्हटल्याने मायलेकाला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

रिक्षात बसू नको म्हटल्याने मायलेकाला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील हरी विठ्ठल नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एका किरकोळ कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या आईला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रिक्षात बसू नका असे सांगितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली असून, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. ५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी रविवार, १० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भरत सुधाकर रंधे (वय २१, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. ५ ऑगस्ट रोजी रात्री भरतच्या भावाच्या रिक्षात त्याच परिसरात राहणारे चिक्या उर्फ अमोल शंकर कोकाटे, करण संजय सोनवणे, गजानन सुतार आणि समीर तडवी हे चौघेजण बसलेले होते. त्यावेळी भरत रंधे याने त्यांना “या रिक्षात बसू नका” असे सांगितले.

याच कारणावरून चिडलेल्या चौघांनी भरत रंधे याला आणि त्याची आईला शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने फायटरने मारहाण केल्याने भरतच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. एवढेच नाही, तर मारहाण केल्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

या गंभीर घटनेनंतर भरत रंधे याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून मारहाण करणारे चिक्या उर्फ अमोल शंकर कोकाटे, करण संजय सोनवणे, गजानन सुतार आणि समीर तडवी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे हे करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound