पुणे, वृत्तसंस्था । महावितरण अंतर्गत ग्राहकांना मीटर रीडिंगचे फोटो हे मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे पाठविण्यासाठी ‘एसएमएस’ आल्यानंतर आतापर्यंत २४ तासांमध्ये फोटो पाठवावा लागत होता. मात्र, त्याची मुदत वाढविण्यात आली असून, ‘एसएमएस’ आल्यानंतर पाच दिवसांत केव्हाही फोटो पाठविल्यास अचूक बील मिळू शकणार आहे.
‘महावितरणकडून रीडिंगच्या निश्चित तारखेच्या एक दिवस अगोदर ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्यासाठी ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येते. मीटर रीडिंग पाठविण्यासाठी असलेली २४ तासांची मुदत वाढविण्यात आली असून, आता पाच दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे रीडिंग पाठविता येणार आहे. ग्राहकांनी पाठविलेले रीडिंग हे स्वीकारण्यात येत आहेत’ असे महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले.
महावितरणकडून केंद्रीकृत वीजबील प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एक ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहेत. रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ही ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद करण्यात आली आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. ग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचा फोटो पाठविल्यास महावितरणकडून घेण्यात आलेल्या रीडिंगऐवजी ग्राहकांनी पाठविलेल्या रीडिंगनुसार बील तयार करण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.