Home प्रशासन नगरपालिका जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावल नगर परिषदेत आज उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत नगर परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात महिलांचे योगदान अधोरेखित करत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यावल नगर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराच्या प्रथम नागरीक तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील या होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष सईदाबी शेख मोहम्मद याकुब, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, नगरसेविका वैशाली बारी यांची उपस्थिती होती. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान महिलांनी स्वावलंबनाच्या दिशेने केलेल्या वाटचालीचे कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिलांनी शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात अधिकाधिक पुढे येण्याचे आवाहन केले. यावल शहरातील बचत गटांच्या महिलांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. महिलांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या विकासात दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान होय. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे उपस्थित पालक आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound