मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे मेंढोदे (खडकाचे) हे गाव हतनूर प्रकल्पांतर्गत मेंढोदे गावाचे पुनर्वसन सण 1973 साली झालेले होते व सन 2012 साली भूखंड आकारणी झालेली होती. या भूखंडाचे एकूण क्षेत्र 13071.51 चौरस मीटर असून, यासाठी भूखंड धारकांना एकूण भरणा करावयाचे कब्जा हक्क रक्कम 103 रुपये चौरस फुटाप्रमाणे होती. परंतु, गावातील भूखंड धारक हे हात मजुर असल्याने कब्जा हक्क रक्कम जास्त होत असल्याने कबजाची रक्कम भरू शकत नसल्याने कुणीही भूखंड ताब्यात घेतले नव्हते. गावातील 117 रहिवासी यांना भूखंड वाटप करण्याचा आदेश 06/03/ 2012 रोजी काढण्यात आला होता.
गावातील गावकऱ्यांचा सुमारे बारा वर्षापासून हा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या पुनर्वसनाच्या बाबतीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवून 4 ते 5 वेळेस बैठका पण घेतल्या होत्या. दि 4 मार्च 2024 रोजी मेंढोदे या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते व सभा देखील झाली होती. यावेळी गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे रखडलेल्या पुनर्वसनाच्या संदर्भात मागणी केली होती व त्यांचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी सतत या पुनर्वसनासंदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री अनिलंदादा पाटील यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करून पूर्वीची 103 रुपये चौरस फुटाप्रमाणे कब्जा हक्क रक्कम आता 53 रुपये चौरसफुटाप्रमाणे भूखंड धारकांना भरणा करावयाची आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.- आरपीए – 2024/प्र.क्र.99/ र-1 दिनांक 19/09/2024 या शासन निर्णयानुसार मौजे मेंढोदे तालुका मुक्ताईनगर येथील भूखंड धारकांच्या कब्जा हक्क रकमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागातून सुधारित आदेश काढण्यात आलेला आहे.
गेल्या बारा वर्षापासून गावकऱ्यांच्या हक्काची जागा त्यांना कब्जा हक्क रक्कम जास्त असल्याने पैसे भरता येत नव्हते हे बाब लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी गावकऱ्यांसमवेत याच गावात 4 मार्च रोजी मेंढोदे ते सुलवाडी पुलाच्या भूमिपूजनासाठी व सभेसाठी आलेले मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 4 ऑक्टोंबर 2024 रोजी याबाबत सुधारित आदेश काढला. तसेच याच गावातील उर्वरित 32 घरांचे पुनर्वसनावावर सुद्धा लवकरच सकारात्मक निर्णय होईल .यावेळी गावकऱ्यांनी 5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांचे जल्लोषात स्वागत करून गावात सत्काराचा कार्यक्रम घेतला व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे पूर्वीची जास्तीची कब्जा हक्क रक्कम आता निम्म्यावर आली असून गावकऱयांचे पुनर्वसन सोपे झाले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.