हाणामारीत विहिरीत ढकलले; खूनाचा झाला उलगडा : दोघांना अटक

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील खेडगाव येथील विहिरीत आढळून आलेल्या अज्ञात इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी दोघा आरोपींना गजाआड केले आहे.

याबाबत वृत्त असे की, दिनांक २३/०९/२०२१ रोजी खेडगाव शिवारातील शेतगट नंबर २२५/२ मधील दत्तात्रय नारायण कोठावदे यांच्या शेतातील विहीरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरुन मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु दाखल होवुन पोलीसांनी तपास चालु केला होता. यानंतर अनोळखी मयताची ओळख पटविण्याकरीता मेहुणबारे पोलीसांनी मयताचे फोटो सर्वत्र प्रसारीत करुन वर्तमानपत्रे,सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले होते.

या प्रयत्नांमुळे संबंधीत मयत व्यक्ती हा तालूुक्यातील बोरखेडा बुद्रुक येथील सोमनाथ प्रभाकर पाटील असल्याची माहिती मिळाली. बोरखेडा बु. येथील अजबराव प्रभाकर पाटील यांचा भाऊ सोमनाथ प्रभाकर पाटील वय ३५ रा. बोरखेडा बु. हा दिनांक २१/०९/२०२१ रोजी बोरखेडा गावातील भिकन पाटील याच्यासोबत मोटार सायकलवर बसुन गेला होता परत आलेला नाही अशी माहिती पोलिसांना मिळाली. यावरून भिकन पाटील याला सोमनाथ बाबत विचारले असता त्याने त्याच दिवशी न्हावे गावी सोमनाथ पाटील गेला असल्याचे अजबराव यांना सांगितले होते. मात्र सोमनाथचा शोध न लागल्यामुळे अजबराव यांनी दिनांक ०२/१०/२०२१ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सोमनाथ पाटील हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अजबराव यांना मेहुणबारे पोलीसांनी अकस्मात मृत्यु मधील अनोळखी मयताचे फोटो,कपडे,बुट दाखविले असता ते त्यांनी आपला भाऊ सोमनाथ प्रभाकर पाटील याचेच असल्याचे ओळखल्याने अज्ञात मयताची ओळख पटविण्यात मेहुणबारे पोलीसांना यश आले होते.

दरम्यान, सोमनाथचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या भावाने मेहुणबारे स्थानकाचे सहा.पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्याकडे व्यक्त केला होता. त्यानुसार पोलीसांनी प्रविण ऊर्फ भिकन पाटील रा. बोरखेडा खु.आणि भटु वसंत सोनवणे रा. कळमडु यांचेकडे व इतरही अनेक संशयीतांकडे वेळोवेळी,आलटुन पालटुन चौकशी केली होती. परंतु संशयीत हे वेळोवेळी उवाडवीची उत्तरे देत होते. मेहुणबारे पोलीसांनी घटनेदिवसापासुन त्यांच्या हालचालींवर गोपनियरित्या सतत पाळत ठेवुन त्यांच्या विषयी तांत्रीक विश्लेषकांची मदत घेवुन अभ्यासपुर्ण तपास करीत असतांना कौशल्याने त्यांच्या सतत बदलत जाणार्‍या जबाबा वरुन त्यांचेवर नजर ठेवण्यात आलेली होती. या संदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर प्रविण ऊर्फ भिकन पाटील व भटु वसंत सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे.

असा झाला खून

प्रविण ऊर्फ भिकन पाटील रा. बोरखेडा खु.आणि भटु वसंत सोनवणे यांनी पोलिसांना तपासात सांगितले की, दि. २१/०९/२०२१ रोजी सकाळी नऊ वाजता भिकन पाटील हा सोमनाथ प्रभाकर पाटील याला त्याच्या मोटारसायकलवर बसवुन खेडगाव येथे आला . त्यानंतर दुपारी सोमनाथ हा दारु पिऊन शेतात आला असता त्याला भिकन पाटील याने तु येथे दारु प्यायला आला आहे की, कामाला आहे ? अशी अपमानास्पद अश्लिल शिवीगाळ केली असता सोमनाथ प्रभाकर पाटील व भिकन पाटील यांच्यात मारामारी झाली. या भांडणात भिकन पाटील याने दारुच्या नशेत असणार्‍या सोमनाथ पाटील याला लाथ मारुन पाण्याने तुडूंब भरलेल्या विहीरीत ढकलुन दिले. यानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले. यानंतर सोमनाथ प्रभाकर पाटील हा सकाळी न्हावे येथे दारु पिण्यासाठी गेला तो परत आला नाही, अशी सोमनाथच्या नातेवाईकांना व गावात खोटी बतावणी केली.

तसेच दिनांक २३/०९/२०२१ रोजी दुपारी सोमनाथ पाटील याचे प्रेत विहीरीतुन वर फुगुन आल्यानंतर भिकन पाटीलचा शालक भटु वसंत सोनवणे याने सदर प्रेताची माहिती भिकन याला फोनद्वारे देवुन भिकनने सदर प्रकरणाची वाच्यता कोणालाही न करण्याबाबत भटुला सांगितली. यामुळे भटु सोनवणे याने देखील सदर घटनेची माहिती पोलीसांना न देता लपवुन ठेवुन भिकन पाटील यास गुन्हयास मदत केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे.यात खुनाचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे; विभागीय पोलीस अधीक्षक कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, उप निरीक्षक हेमंत शिंदे, उप निरीक्षक योगेश ढिकले, प्रकाश चव्हाणके, प्रताप मथुरे, सिध्दांत शिसोदे, हनुमंत वाघेरे , गोरख चकोर, शैलेश माळी यांच्या पथकाने केली.

Protected Content