पाडळसरे प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे बैठक !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले.


दिल्ली येथे भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांचे उपस्थितीत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील खा.श्रीमती स्मिताताई वाघ यांचेसह पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करणेबाबत जलशक्ति मंत्रालयातर्फे सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (PIB) समोर सादर करण्यात आला असल्याचे ना.सी.आर.पाटील यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले.

निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत व्हावा म्हणून पाडळसे धरण जन आंदोलन समिती सातत्याने पाठपुरावा करीत आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी व खा.श्रीमती स्मिताताई वाघ यांनी धरण समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे,उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे विकास पाटील, शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पवार,समितीचे देविदास देसले,प्रताप साळी, भरतसिंग परदेशी यांना सोबत घेवून दिल्ली येथे सदर बैठक लावली होती . यावेळी ना. अनिल पाटील यांनी सदर प्रकल्पाबाबत राज्य शासनातर्फे सर्व प्रकारे औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याचे सांगत धरणाबाबत गतिमानतेने केंद्रीयस्तरावर प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावे यासाठी आग्रह धरला. तर खा.स्मिता वाघ यांनी ना.सी.आर.पाटील यांना शेतकऱ्यांची संबंधित महत्वपूर्ण अशा या प्रकल्पात विशेष लक्ष घालण्याची विनंती केली.याप्रसंगी धरण समितीच्यावतीने मा.सुभाष चौधरी, रणजित शिंदे आदींनी याप्रसंगी झालेल्या चर्चेत खान्देश सुपुत्र जलशक्ती मंत्री यांच्याकडून अमळनेरसह सहा तालुक्याची जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असून सदर प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होण्याबाबत संपूर्ण सहा तालुक्यातील जनता आशावादी आहे असे सांगितले.

सदर बैठकीस उपस्थित उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी पाडळसरे धरण जनांदोलन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह निम्न तापी पाडळसे धरण व खान्देश पाणी प्रश्नावर नार-पार गिरणा प्रकल्पाबाबत सविस्तर निवेदन ना.सी.आर पाटील यांना देत याबाबत पुढाकार घेण्याची विनंती केली.

Protected Content