मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. इतकेच नाही काही जागांबाबत अंतिम निर्णय देखील झाला असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची एक समन्वय समिती तयार करून या समितीच्या माध्यमातून चर्चा करायला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार महाविकास आघाडीतील विद्यमान आमदारांच्या पहिल्या जागा त्या-त्या पक्षांना वाटल्या जातील. त्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीमधील ज्या पक्षाची जास्त ताकद असेल, त्या पक्षाला ती जागा सोडली जाणार आहे. या सूत्रानुसार लवकरात लवकर जागांची चाचपणी करायला सुरुवात करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मविआचे शिल्पकार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली आहे. या बैठकीत संपूर्ण जागावाटप कसे होणार, हे स्पष्ट झाले नसले तरी काही जागांबाबत अंतिम निर्णय झाला आहे. प्राथमिक जागावाटपासाठी नेत्यांनी सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार आता मविआमधील जागा वाटप होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील महाविकास आघाडीने जागा वाटप आणि उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली होती. तर दुसरीकडे महायुतीकडून उशीरा उमेदवार जाहीर झाले. त्याचाही फटका निवडणुकीत महायुतीला बसला होता. त्यानुसार आता विधानसभा निवडणुकीत देखील जागावाटपात महाविकास आघाडीने पुढाकार घेतला आहे. तर महायुतीमध्ये अद्याप तरी तशी चर्चा सुरू झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.