मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या विविध मुद्द्यांवर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचा गेल्या काही दिवसांपासून सक्रिय पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये अनेक विषय मार्गी लागले असून, काही समस्यांचे निराकरण होण्याच्या मार्गावर आहेत. याच पार्श्वभूमीवर तांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा:
तांबे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आणि त्यात संगमनेर येथील पोलिस वसाहत प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी आराखडा आधुनिक पद्धतीने तयार करण्याची मागणी केली. तसेच, राज्यातील डॉक्टरांसाठी वकिलांच्या प्रमाणे संरक्षणासाठी कायदा करण्याची विनंती केली.
मुख्यमंत्र्यांना दिल्या विविध मागण्या:
होमिओपॅथिक डॉक्टरांच्या आणि सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत बैठक आयोजित करावी. अहमदनगरच्या कौटुंबिक न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक करावी. निळवंडे प्रकल्पाच्या नियोजनावर चर्चा करावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानावर नियुक्त शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी. ग्रामीण भागातील प्रलंबित मुद्द्यांवर बैठका आयोजित कराव्यात.
संगमनेर शहरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदी सुधार प्रकल्पासाठी मुख्यमंत्री निधी मंजूर करावा. लघु वृत्तपत्र क्षेत्राच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करावी.
तांबे यांचा सक्रिय पाठपुरावा:
आमदार तांबे हे आपल्या कामाचे प्रगती पुस्तक समाज माध्यमांवर आपल्याला दाखवत असतात आणि सभागृहात अनेक मुद्दे उपस्थित करून समस्यांना वाचा फोडत असतात. त्यांनी राज्याच्या विविध समस्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून ते लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली आहे.