मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर “शेतकरी जनआक्रोश मोर्चा” धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या नियोजन बैठकीत मोर्चाच्या आयोजनाची आखणी झाली. माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी नेते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि जीवन-मरणाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. केळी पिक विमा कंपन्यांच्या अटींचा शेतकऱ्यांवर वाढता ताण, ई-पिक पाहणीची सक्तीमुळे निर्माण होणारे तांत्रिक अडथळे आणि रासायनिक खत खरेदीसाठी लादण्यात आलेली लिंकिंग प्रणाली यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे, याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी या अडचणी तात्काळ दूर करण्याची आवश्यकता असून, सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधून योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

तसेच, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, केळी पिकाला हमीभाव लागू करावा आणि कापसाला उत्पादन खर्चानुसार योग्य बाजारभाव मिळावा, अशा मूलभूत मागण्या पुढे मांडण्यात आल्या. याशिवाय मध्यप्रदेश सरकारप्रमाणे नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झालेल्या केळी पिकासाठी प्रति हेक्टर दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणीही बैठकीत झाली. या सर्व मागण्यांविषयी राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा आयोजकांनी दिला.
हा मोर्चा पूर्णपणे राजकीय पक्ष विरहित असून, कोणताही झेंडा न वापरता फक्त शेतकऱ्यांच्या एकतेचा प्रतीक असलेला काळा झेंडा वापरण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (कोर्ट चौक) येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा निघणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार असून, शेतकऱ्यांच्या या संघर्षाला व्यापक जनसमर्थन मिळेल, असा विश्वास माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी व्यक्त केला.
या मोर्चाच्या माध्यमातून शासनाच्या दुर्लक्षाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरतो आहे. ही केवळ घोषणा नसून, संघर्षाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. शेतकरी आता अन्याय सहन करणार नाही, आणि त्याचा स्पष्ट इशारा १७ सप्टेंबरच्या मोर्चातून मिळणार आहे.



