मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असतानाच एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसैन दलवाई हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला सामनाच्या कार्यालयात आले आहे. दलवाई काँग्रेसचा कोणता निरोप घेऊन राऊतांकडे आले असतील, अशा प्रश्नांनी राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेना एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली, तरच काँग्रेस पाठिंबा देईल, अशी अट ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीत घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस सशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. हुसैन दलवाई काँग्रेसचा कोणता निरोप घेऊन राऊतांकडे आले आहेत, याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमधील तरुण आमदारांचा गट शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक आहे. भाजपला सत्ता आणि मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचे काही आमदार तयार असल्याचं म्हटलं जाते असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झाली होती. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दोघांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी सोनिया गांधी यांनी शिवसेनेला सशर्त पाठिंब्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे.