वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव ग्रामीण रूग्णालयात कनिष्ठ लिपीक यांना शिवीगाळ केली तर वैद्यकीय अधिकारी यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना सोमवार २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी मंगळवार २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव ग्रामीण रूग्णालयात सोमवारी २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता अधीपरीचारिका कक्षात कनिष्ठ लिपीक आकाश इंगळे यांना संशयित आरोपी निलेश काळे, श्रीराम हजबन आणि नरेंद्र हजबन तिघे रा. वरणगाव यांनी “तुला रेफर मेमो लिहिण्याचा अधिकार काय, माजला आहे का….? तुम्हाला जास्त झालेली आहे” असे बोलून यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश उगले यांना उपचार का करीत नाही असे सांगून धक्काबुक्की करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसचे तुम्ही कशी नोकरी करता ते पाहून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी कनिष्ठ आकाश इंगळे यांनी मंगळवारी २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून निलेश काळे, श्रीराम हजबन आणि नरेंद्र हजबन तिघे रा. वरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.