Home आरोग्य जिल्ह्यातील लंपी प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू !: उपायुक्त डॉ. प्रदीप झोड

जिल्ह्यातील लंपी प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू !: उपायुक्त डॉ. प्रदीप झोड


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, धरणगाव आणि पारोळा तालुक्यांमध्ये गायींमध्ये लम्पी स्किन डिजीजचे किरकोळ प्रकरणे आढळून आल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. या पार्श्वभूमीवर, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी रविवार, २० जुलै एरंडोल, धरणगाव आणि पारोळा या बाधित तालुक्यांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक पशुपालकांशी थेट संवाद साधला आणि लम्पी रोगाचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी खालील बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले:

रुग्ण जनावरांचे विलगीकरण : बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. योग्य निगा, स्वच्छता व व्यवस्थापन: गोठ्यांमध्ये आणि जनावरांच्या आसपास स्वच्छता राखावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना व वेळोवेळी मार्गदर्शन: लसीकरण आणि इतर प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यावा. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे नियमित पालन करावे. स्थानिक पशुवैद्यकीय यंत्रणेशी समन्वय साधणे: कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास तात्काळ स्थानिक पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा.

डॉ. झोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी घाबरून न जाता, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी पूर्णपणे सज्ज असून, सर्व पशुपालकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लम्पी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.


Protected Content

Play sound