Home Cities भुसावळ वरणगावात नवीन पाईपलाईनसाठी नगराध्यक्षांचे रस्त्यावरच ठिय्या आंदोलन

वरणगावात नवीन पाईपलाईनसाठी नगराध्यक्षांचे रस्त्यावरच ठिय्या आंदोलन


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामात प्रशासकीय अडथळे निर्माण झाल्याने, अपक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पाईपलाईन टाकण्यास परवानगी मिळत नसल्याने संतापलेल्या नगराध्यक्षांनी आज भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले आहे.

वरणगाव शहरातील संबंधित प्रभागात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही पाईपलाईन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रातून जात असल्याने नियमानुसार बाजार समितीची परवानगी आवश्यक आहे. मात्र, बाजार समितीकडून ही परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सुनील काळे यांनी केला आहे. यामुळे पाईपलाईनचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

भर उन्हात रस्त्यावर ठिय्या :
प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षांनी आज दुपारी थेट रस्त्यावर बसून उपोषण सुरू केले. उन्हाचा कडाका वाढलेला असतानाही त्यांनी आपली जागा सोडलेली नाही. “जोपर्यंत बाजार समिती पाईपलाईनसाठी अधिकृत परवानगी देत नाही आणि काम पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत मी रस्त्यावरून उठणार नाही,” अशी खंबीर भूमिका सुनील काळे यांनी घेतली आहे.

शहरात चर्चेला उधाण :
नगराध्यक्ष स्वतः रस्त्यावर आंदोलनाला बसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात समर्थकांची आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षांना स्वतःच्याच शहरातील कामासाठी अशा प्रकारे रस्त्यावर उतरावे लागत असल्याने बाजार समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या आंदोलनानंतर वरिष्ठ प्रशासन किंवा बाजार समिती काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण वरणगावचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound