Home Cities जळगाव निकृष्ट रस्ते कामावर महापौरांचा संताप; अभियंत्यांना झाडाझडती, दर्जेदार कामाचे आदेश

निकृष्ट रस्ते कामावर महापौरांचा संताप; अभियंत्यांना झाडाझडती, दर्जेदार कामाचे आदेश


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील रस्ते डागडुजी कामांमधील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांकडून तक्रारी येताच महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अभियंत्यांना झाडाझडती दिली. बहिणाबाई चौक परिसरात करण्यात आलेल्या या पाहणीदरम्यान कामाचा दर्जा सुधारण्याचे आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानापासून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापौरांकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी महापौरांनी घटनास्थळी भेट देत कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

रस्ते डागडुजी आणि पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू असले तरी ते केवळ रिंग रोड आणि जिल्हा पेठेतील काही भागापुरतेच मर्यादित असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व बाबींची दखल घेत महापौरांनी अधिकाऱ्यांना कामाचा विस्तार वाढवण्याच्या सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान शहर अभियंता योगेश बोरोले आणि योगेश वाणी यांच्याकडून कामाचा सविस्तर अहवाल घेण्यात आला. महापौरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, केवळ ठराविक भागांमध्ये काम करून चालणार नाही, तर संपूर्ण रस्त्याचा पट्टा दर्जेदार पद्धतीने दुरुस्त केला गेला पाहिजे. पेव्हर ब्लॉक बसवताना गुणवत्ता राखणे अत्यावश्यक असून भविष्यात पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय, रेंगाळलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देत प्रशासनाला अधिक जबाबदारीने काम करण्यास सांगण्यात आले. नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या कामांमध्ये कसलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले. “तक्रारी मिळताच आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी दूर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत,” असे महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महापौरांच्या या कठोर भूमिकेमुळे शहरातील रस्ते कामांमध्ये सुधारणा होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound