जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी पहिल्या दिवसापासून थेट ग्राऊंड लेव्हलवर काम करणार्या महापौर भारतीताई सोनवणे यांच्या मुलीसह तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे त्या स्वत:हून क्वॉरंटाईन झाल्या आहेत.
कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर जनतेच्ये सेवेसाठी जळगावातील सोनवणे दाम्पत्याने केलेले काम हे कुणी विसरू शकणार नाही. महापौर भारतीताई आणि त्यांचे पती कैलासआप्पा यांनी पहिल्या दिवसापासून फवारणीसारख्या उपाययोजनांपासून ते कोविड केअर सेंटरमधील नियमीत भेटींच्या माध्यमातून केलेले काम जळगावकरांच्या कौतुकास पात्र ठरले आहे. याआधी महापौर भारतीताई यांची केलेली स्वॅब तपासणी निगेटीव्ह आली होती. तर कालच त्यांच्या मुलीसह घरातील तिघे पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याने त्या स्वत:हून क्वॉरंटाईन झाल्या आहेत. त्यांची मुलगी, दीर व पुतण्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतीताई लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होतील ही जनतेला अपेक्षा आहे.
दरम्यान, अलीकडेच भाजपच्या विद्यमान दोन नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यापैकी एकाने कोरोनावर मात केली आहे. तर एकावर उपचार सुरू आहेत.