मुंबई प्रतिनिधी । महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शहर विकासासाठी निधीचे साकडे घातले. याप्रसंगी झालेल्या सविस्तर चर्चेतून ना. शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत, लवकरच जळगावला भेट देणार असल्याचे सांगितले.
महापौर जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी आज नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर व माजी उपमहापौर सुनील महाजन हे देखील उपस्थित होते. या भेटीत महापौर आणि उपमहापौरांनी जळगावच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केली.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावात विकासकामे सुरू असून यात नगरविकास खात्याकडून जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी महापौर व उपमहापौर यांनी केली. यातून जळगाव शहरात समग्र विकास साधण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यात शहरातील पायाभूत सुविधांससह नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
जळगाव महापालिकेतील आधीच्या सत्ताधार्यांनी जळगावकरांना अवास्तव स्वप्ने दाखविली, अचाट दावे केलेत. मात्र आपण याप्रमाणे काहीही न करता जमीनीशी जुळून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत, पायाभूत सुविधांवर भर देऊन जळगावला प्रगतीपथावर घेऊन जावे. आणि यासाठी आपण महापालिकेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे वचन ना. एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिले.
दरम्यान, ना. एकनाथ शिंदे यांनी जळगावातील कामांबाबत माहिती जाणून घेत, सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. कोविडची आपत्ती कमी झाल्यानंतर आपण जळगाव महापालिकेला भेट देणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जळगावच्या विकासासाठी आपण निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.