नवी दिल्ली वृत्तसंस्था | विरोधकांचे फोन टॅप करण्याचे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा फोन देखील टॅप होत असल्यास नवल वाटता कामा नये अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, पेगॅसस सॉफ्टवेअरच्या हेरगिरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. यात आता शिवसेनेचे प्रवक्त खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, ज्या लोकांचे फोन टॅप त्यात मोठ्या संख्येने पत्रकार आहेत. पत्रकारांचे फोन टॅप करून काय करायचं होतं माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा फोन टॅप झाला का माहिती नाही.. पण महाराष्ट्रातील सरकार बनत असताना अनेक लोकांचे फोन टॅप झाले होते त्याची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कोणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं ते म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी हे काय चालू आहे हे देशाच्या जनतेला समोर येऊन सांगितले पाहिजे. संसदीय मंत्र्यांनी काल सर्व विषयांवर चर्चा करू असं म्हटलं आहे. अनेकदा सरकार बाहेर एक गोष्ट म्हणतं आणि प्रत्यक्ष चर्चेपासून पळ काढतात. पण यावेळी मागे हटायचं नाही असं सर्व विरोधकांनी ठरवलं असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.