विधानपरिषद निवडणूकीसाठी मविआचे जागावाटप ठरले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमधील तिढा सुटला आहे. उद्धव ठाकरे गटाने परस्पर चार उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. ठाकरे गटाने उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसने केली होती. काँग्रेसच्या मागणीला मान देऊन ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या जागेवरून ठाकरे गट निवडणूक लढण्यावर ठाम असून कोकण मतदारसंघातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोकणामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढणार आहे.

महाविकास आघाडीमधील तिढा सोडवण्यासाठी झालेल्या तडजोडीनुसार नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर कोकणची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. नाशिकमधून ठाकरे गटाचे उमेदवार अ‍ॅड. संदीप गुळवे निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. नाशिकमधून काँग्रेसचे दिलीप पाटील माघार घेणार आहेत. तर या मोबदल्यात कोकणामधून ठाकरे गटाचे किशोर जैन माघार घेत आहेत. कोकणातून काँग्रेसचे रमेश कीर निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळवल्याने विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीने एकत्र लढावे असे प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून सुरू होते. या वाटाघाटीमुळे महाविकास आघाडी आता एकत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content