मुंबई (वृत्तसंस्था) राजधानीतील अनेक पादचारी पूल धोकादायक स्थितीत असून सीएसएमटी पादचारी पुलाची दुर्घटना घडण्याच्या काही दिवस आधी माटुंगा येथील झेड पूलाच्या अवस्थेबाबत तेथील जागरूक नागरिकांनी आवाज उठवला आहे. मात्र, प्रशासनाने या पूलाबाबत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. माटुंगा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा प्रसिद्ध पूल कमकुवत झाल्याची लेखी तक्रार फारूख ढाला आणि इरफान मच्छीवाला या जागरूक नागरिकांनी राज्य सरकारकडे केली आहे.
फारूख ढाला आणि इरफान मच्छीवाला या जागरूक नागरिकांनी सीएसएमटी हिमालय पूल दुर्घटना घडण्याच्या आठ दिवस आगोदर, ६ मार्च या दिवशी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास खात्याचे सचिव, मुंबई महापालिका आयुक्त, मुंबईचे महापौर यांना अर्जाद्वारे पुलाची स्थिती लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
माटुंगा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या झेड पुलावरील टाइम्स गेल्या दोन वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. या पुलाच्या फ्लोअरिंगची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे अर्जात म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत तर या पुलावरून जाणे धोकादायक आहे, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. पुलावरील टाइल्स तुटल्यामुळे पुलावर खड्डे निर्माण झाले आहेत, याकडेही अर्जात लक्ष वेधण्यात आले आहे.
दररोज सुमारे दीड लाख पादचारी या पुलाचा वापर करत असतात. यात चाकरमानी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तथापि, प्रशासनाने यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई केलेली नसल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. या पुलाची तत्काळ डागडुजी करण्याची आवश्यकता असल्याचेही अर्जात म्हटले आहे.