मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सत्ता संघर्षाबाबत मॅच फिक्सींग झाले असून या अनुषंगाने आज निर्णय देण्यात येणार असल्याचे जोरदार टिकास्त्र खासदार संजय राऊत यांनी सोडले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, राज्यातील सत्ता संघर्षावर विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर हे शिवसेनेतील अंतर्गत कलहावर नेमके कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र ? याचा महत्वाचा निर्णय देणार आहे. याआधी राजधानीतील हालचाली गतीमान झाल्या आहे. काल रात्री उशीरा एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. तर आज सकाळी मंत्रीमंडळाची बैठक होत आहे.
या पार्श्वभूमिवर, आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, राहूल नार्वेकर यांनी काल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही गैर आहे. एकीकडे अपात्रतेचा निर्णय होत असतांना आधीच मुख्यमंत्री शिंदे यांचा दावोस दौरा ठरविण्यात आलेला आहे. तर मोदींचा १२ रोजी राज्यात दौरा होत आहे. या सर्व बाबी अपात्रतेच्या निकालाची मॅुच फिक्सींग होत असल्याकडे निर्देश करत आहेत. ही फिक्सींग झाली असून आज औपचारीक निकाल देण्यात येणार आहे.
खासदार राऊत पुढे म्हणाले की, वर नमूद केलेल्या तिन्ही बाबी आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहोत. राज्यात संविधानाची पायमल्ली होत आहे. आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वास आहे. आणि जनता आमच्या सोबत राहणार असल्याचेही राऊत म्हणाले.