Home क्राईम रसलपूर–आभोडा मार्गावर वृक्षतोडीचा धुमाकूळ ; वन विभागाचे दुर्लक्ष

रसलपूर–आभोडा मार्गावर वृक्षतोडीचा धुमाकूळ ; वन विभागाचे दुर्लक्ष


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुड्याकडे जाणाऱ्या रसलपूर–आभोडा मार्गावर मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचा समतोल आधीच ढासळत असताना, सातपुड्याच्या पायथ्याशी शेकडो झाडांची कत्तल झाल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही घटना १४ /८/ २०२५ची असून याबाबत रविंद्र पवार यांनी वन अधिकारी जमीर शेख यांच्या कडे तक्रार केली आहे.. तरी या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सातपुडा पर्वतरांग परिसरातील रसलपूर–आभोडा मार्ग हा रस्ता पूर्वी दाट झाडांनी वेढलेला होता. प्रवाशांना सावली आणि थंडावा देणारी अनेक वर्षांची झाडे या मार्गाची ओळख होती. मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्याने उघडी-बोडकी जमीन दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असून ही तोड परवानगीशिवाय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही रावेर तालुक्यातील खानापूर परिसरात वृक्षतोडीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्या प्रकरणात ठोस कारवाई झाली नसल्यानेच अशा प्रकारांना उत्तेजन मिळत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. सरकारकडून वृक्षतोडीबाबत कडक नियम आणि आदेश जारी करण्यात आले असतानाही प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट होत आहे.

बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तापमानवाढ, पावसाचे अनियमित स्वरूप, दुष्काळसदृश परिस्थिती आणि जैवविविधतेवर होणारे दुष्परिणाम याचा थेट परिणाम स्थानिकांवर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी होत असलेल्या या प्रकारामुळे भविष्यातील पर्यावरणीय संकटाची चाहूल लागत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या प्रकरणी वृक्षप्रेमी रविंद्र पवार यांनी वन विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. “सातपुड्याच्या पायथ्याशी एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्थानिक ग्रामस्थांनीही दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, स्थानिक पत्रकारांनी वनक्षेत्रपाल श्रीकांत काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. पंचनामा करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात कितपत कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.


Protected Content

Play sound