जामनेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मालेगाव तालुक्यातील चार वर्षांच्या चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी जनक्षोभ उसळला आहे. या भीषण घटनेतील आरोपीला तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी जामनेर शहरात विविध समाज घटक आणि सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला. या मोर्चातून समाजातील संताप आणि मुलींच्या सुरक्षेबाबतची चिंता प्रखरपणे व्यक्त झाली.
यज्ञा दुसाने ही निरागस बालिका डोंगराळे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील रहिवासी होती. तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण प्रदेशात भीती आणि रोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी जामनेर तालुका अहिर सुवर्णकार समाज, सोनार समाज, बंजारा समाज तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधींनी संयुक्तपणे मोर्चाचे आयोजन केले. आरोपीला सर्वाधिक कठोर शिक्षा मिळावी, अशा भावनेने नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून पुढे जात तहसील कार्यालयात पोहोचला. येथे नायब तहसीलदार सतीश इंगळे यांना आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करणारे लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात चिमुकल्या मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत सरकारने कठोर पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष साधना महाजन, श्याम चैतन्य महाराज, डॉ. प्रशांत भोंडे, निलेश चव्हाण, अहिर समाजाचे अध्यक्ष प्रदीप दुसाने, सुधाकर सराफ, विजय दुसाने यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध केला. मोर्चादरम्यान ‘यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘अत्याचार करणाऱ्यांना तात्काळ फाशी द्या’, अशा घोषणा जोरात देण्यात आल्या.
निवेदन स्वीकृतीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र आरोपीला कडक शिक्षा मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका समाज प्रतिनिधींनी स्पष्ट केली. मुलींच्या सुरक्षेसाठी अधिक कडक कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे मतही मोर्चादरम्यान वारंवार मांडले गेले.



