अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मुडी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर महसूल पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मोहिमेत तिन्ही ट्रॅक्टर जप्त करून अमळनेर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहेत. या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


या मोहिमेसाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने कार्यवाही केली. या पथकामध्ये वावड्याचे मंडळाधिकारी पी.एस. पाटील, नगावचे मंडळाधिकारी व्ही.पी. पाटील, ग्राम महसूल अधिकारी ए.बी. सोनवणे, सारबेट्याचे महसूल अधिकारी आशिष पारध्ये, शिरसाळे बु.चे जितेंद्र पाटील, तसेच जैतपिर मंडळाचे जितेंद्र पाटील यांनी सहभाग घेतला.
महसूल पथकाने २० जानेवारीच्या रात्री मुडी प्र डांगरी येथे अचानक छापा टाकला. या मोहिमेत मनोज देडगे यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. १९ बी.जी. ४६६५), शुभम सूर्यवंशी यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. १८ बी.एक्स. ५८६६), तसेच सुनील भिल यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. १९ ए.एन. ७६३६) हे अवैध वाळू वाहतूक करताना आढळले. तिन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. या घटनेनंतर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाच्या या कारवाईमुळे दहशत निर्माण झाली आहे.


