अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथील जी.एम.सोनार नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात भव्य सामूहिक पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वारीप्रमुख ज्योतीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलाभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता पारायण वाचनाने करण्यात आली. संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे वाचन महिलांनी सामूहिकपणे केले. वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी वाचनाचे नेतृत्व केले, तर या पवित्र ग्रंथ वाचनात अनेक महिलाभक्त सहभागी झाल्या.
पारायण वाचनानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले. आरतीनंतर सर्व उपस्थित भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर.बी. पवार, अशोक भावे महाराज, नितीन भावे, सेवेकरी रघुनाथ पाटील, मोहित पवार आदींसह गजानन महाराज परिवारातील महिला, भगिनी, आणि बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंदिर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. सामूहिक पारायणामुळे आध्यात्मिक उर्जा मिळाल्याचा अनुभव भक्तांनी व्यक्त केला. गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. भक्तांच्या सहभागामुळे जागतिक पारायण दिनाचे महत्त्व अधोरेखित झाले, असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर.बी. पवार यांनी सांगितले.