यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम निर्माण करणारी घडामोड नुकतीच घडली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तालुका कार्यकारिणीतील ग्रामीण (ब्लॉक) स्तरावर दोन महत्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली असून, यामुळे तालुक्यात काँग्रेस पक्षात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच झालेल्या निवडीत, यावल तालुका काँग्रेस कमेटीचे नवनियुक्त अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली मारूळ येथील मसरूर अली मोहम्मद अली यांची तालुका काँग्रेस कमेटीच्या ग्रामीण ब्लॉकच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. तसेच, मतीऊर्र रहेमान पिरजादे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या आदेशानुसार आणि माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या शिफारसीनुसार करण्यात आल्या आहेत.

मसरूर अली हे मारूळ गावातील एक सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला असून त्यांचा जनसंपर्क आणि कार्यशैलीमुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, मतीऊर्र रहेमान पिरजादे हेही कार्यक्षम, संयमी व संघटनात्मक कामात पारंगत व्यक्तीमत्त्व मानले जातात.
या दोघांच्या निवडीचे स्वागत तालुक्यातील विविध काँग्रेस नेत्यांनी मोठ्या उत्साहात केले आहे. माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, काँग्रेसचे युवा नेतृत्व धनंजय चौधरी, मारूळचे माजी सरपंच जावेद अली जनाब, सध्याचे लोकनियुक्त सरपंच सैय्यद असद अली, प्रदेश कमेटी सदस्य उमेश जावळे, हाजी गफ्फार शाह, काँग्रेसचे शहराध्यक्ष हकीम मोहम्मद याकुब, अनिल जंजाळे, अभय महाजन, धीरज कुरकुरे आदींनी या निवडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हे नवे नेतृत्व प्रभावी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.



