बिजिंग (वृत्तसंस्था) चीनने पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचवेळी मसूद अझहारला पाठींबा देणे मात्र थांबवलेले नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी म्हटले की, ‘आम्हाला पुलवामा दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्तब्धच झालो आहोत. शहिदांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा निषेधच करतो. या क्षेत्राला असलेला दहशतवादाचा धोका संपवण्यासाठी सहकार्य करून शांती आणि स्थिरता राखण्याचा आम्ही प्रयत्न करू.
यावेळी गेंग शुआंग यांना मसूद अजहर याचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याबाबचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शुआंग यांनी म्हटले, ‘सुरक्षा परिषदेच्या १२६७ समितीने यादी तयार करण्याबाबतचे नियम स्पष्ट केलेले आहेत, त्याच प्रमाणे दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याबाबतचे नियमही स्पष्ट केले आहेत. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा समावेश प्रतिबंध यादीत करण्यात आलेलाच आहे. चीन हा मुद्दा अतिशय जबाबदारीने हाताळणे सुरूच ठेवणार आहे.
भारताने मात्र अजहरवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची मागणी लावून धरली आहे. मसूद अजहरसह इतर दहशतवाद्यांच्या यादीबाबतच्या प्रस्तावास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (१२६७) मंजुरी समितीद्वारे दहशतवादी घोषित करण्यासाठी विविध देशांनी समर्थन द्यावे, असे आवाहन भारताने केले आहे. पाकव्याप्त भागातून दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचीही भारताने मागणी केली आहे. परंतु, UNSC चा स्थायी सदस्य असलेल्या चीनने भारताच्या या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला आहे.