नवीदिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त राष्ट्रसंघाने अखेर जैश-ए-मोहम्मद चा प्रमुख आणि भारतीय संसदेवर आणि पुलवामा येथे झालेल्या जवनांवरील हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अझहरला आज अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे.संयुक्त राष्ट्रसंघातील १५ पैकी १४ देशांनी यासाठी भारताला आपले समर्थन दिले आहे. चीननेही आपला विरोध मागे घेवून या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारताच्या दबावापुढे आणि अमेरिका, ब्रिटन, फ्रांस सारख्या देशांच्या एकजुटीपुढे चीनला झुकावे लागले आहे.
या आधी गेल्या १० वर्षांत चारवेळा चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करून पाकिस्तानची मदत करीत मसूदला वाचवले होते. पण यावेळी केंद्र सरकारने उत्कृष्ट डावपेच आखून चीनची चौफेर कोंडी केल्याने संपूर्ण जगापुढे उघडे पडण्याची धास्ती चीनला निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला आपली चाल अखेर बदलावी लागली. त्याचवेळी जर चिनने पाकिस्तानच्या बाजूने हट्ट धरून ठेवला असता तर त्याला खुल्या मंचावर याविषयी चर्चा करावी लागण्याचेही भय सतावत होते. तसे झाले असते तर पाकिस्तानही पूर्ण उघडा पडला असता आणि त्याच्यावर बंदी घातली गेली असती तर चीनने पाकिस्तानात केलेली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक वाया जाण्याची भीतीही चीनला होती. भारताच्या राजकीय डावपेचात भक्कम अडकलेल्या चीनला या प्रस्तावाला पाठींबा देण्यावाचून गत्यंतरच उरले नव्हते. केंद्रातील मोदी सरकारची हे मोठे यश मानले जात आहे.