ठाकरे सरकारच्या विरोधात चाळीसगावात मशाल मोर्चा (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सात हजार शेतकरी बांधवांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आल्याने आ.मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांनासोबत चर्चेदरम्यान चकमक झाली. त्यामुळे आमदारासह शेतकऱ्यांना एम.आय.डीसी. पोलीसांनी अटक केलेली असताना आज सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपातर्फे शहरातील विश्राम गृह येथून मशाल मोर्चा काढण्यात आला.

तालुक्यातील ७ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले असल्याने  तालुक्यात दि. २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल असताना तालुक्यातील सात हजार शेतकरी बांधवांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन  महावितरण कंपनीकडून बील न भरण्याचे कारण सांगून खंडित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची व्यथा समजून आ. मंगेश चव्हाण यांनी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन दि.२६ मार्च रोजी सायंकाळी जळगाव येथे कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले. मात्र आमदारांसह शेतकरी व अधिकारी यांच्या चर्चेदरम्यान चकमक झाल्याने आमदारांसह शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे पडसाद म्हणून आज सायंकाळी ७ वाजता शहरातील विश्राम गृह येथून भाजपातर्फे मशाल मोर्चा काढण्यात आली. ती शहर पोलिस स्टेशन पर्यंत होती.

एकूण तीस जणांना अटक करण्यात आल्याने आज दि.२७ मार्च रोजी चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द व सीम, तळेगाव, ब्राम्हणशेवगे, हिरापूर, पिलखोड, चिंचगव्हाण फाटा, वाघळी, खरजई, तळोदे प्रदे, तमगव्हाण, चैतन्य तांडा, सांगवी, शिरसगाव, पाटणा, वलठाण, न्हावे, ढोमणे आदी अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको, निदर्शने व ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलने केली. देवळी तळेगाव गटातील शेतकऱ्यांनी तळेगाव सबस्टेशनवर धडक देत उपस्थित कनिष्ठ अभियंता यांच्याकडे वीज कनेक्शन कट केल्याचा निषेध नोंदवला तर मेहुणबारे – दहीवद गटातील शेतकऱ्यांनी चिंचगव्हाण फाटा येथे एकत्र येत रास्ता रोको करून आपला निषेध नोंदवला. दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा व त्यांना अटक केल्याचा लाइव व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांवर त्याच्या तीव्र स्वरूपात प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

Protected Content