जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “संघर्ष करून आदिवासी उभा राहतो, पण संघर्ष केवळ अस्तित्वासाठी नसून प्रगतीसाठीही हवा. वैयक्तिक वनहक्क मिळाल्यानंतर केवळ जमिनीत गुंतून न राहता, ती कशी उत्पादक बनवता येईल यावर भर द्यायला हवा. सामूहिक शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, विश्वासू पुरवठादार बनून जंगल आणि शेती समृद्ध करूया,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. जैन हिल्स येथे आदिवासी विकास विभाग आणि जैन इरिगेशनच्या सहकार्याने पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारकांसाठी ‘मसाला समूह’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी बोलत होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करून आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक पद्मनाथ म्हस्के, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, अग्रणी बँकेचे प्रणवकुमार झा, मत्स्य विभागाचे अतुल पाटील आणि जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
“आदिवासी शेतकऱ्यांना केवळ जमीन मिळाल्याने विकास होत नाही. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सेंद्रीय शेती, गट शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. तीन ते सहा महिन्यांत उत्पन्न मिळणाऱ्या पीकपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मूलमंत्रानुसार काम करायला हवे. संघटित शेती करताना गट तयार करून त्यांना कंपनी स्वरूप द्यावे, जेणेकरून आदिवासी शेतकरी सक्षम पुरवठादार बनतील,” असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जैन इरिगेशनच्या करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी मसाला पिकांसह कांदा, टोमॅटो, हळद, लसूण, आलं आणि मिरची यांसारख्या पिकांबाबत माहिती दिली. “बारमाही शेतीसाठी केवळ मेहनत पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. ठिबक आणि स्प्रिंकलर तंत्रज्ञानाद्वारे पाण्याची बचत करून अधिक उत्पादन घेता येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भवरलालजी जैन यांनी जैन हिल्सच्या खडकाळ जमिनीवर अत्याधुनिक शेती उभारून दाखवली, तीच प्रेरणा सातपुड्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी घ्यावी. महाराष्ट्र शासन आणि आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन सातपुड्याच्या डोंगररांगांना सुजलाम् सुफलाम् करण्याचा संकल्प करावा.”
शेतकऱ्यांच्या वतीने जनाबाई बारेला, मुस्तफा तडवी, पिंटु बारेला, फुलसिंग बारेला, ताराचंद बारेला आणि कस्तुरीबाई यांनी मनोगत व्यक्त केले. “शेतीच्या पारंपरिक पद्धती बदलून तंत्रज्ञान स्वीकारले तरच शेती फायदेशीर ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनूस तडवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले. या दोन दिवसीय कार्यशाळेत रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यातील अनेक आदिवासी वनहक्कधारक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शासनाच्या विविध योजनांची माहिती देत सेंद्रिय शेती, गट शेती आणि करार शेती यावर भर देण्यात आला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामूहिक शेती आणि जंगल संवर्धन हेच भविष्यातील आर्थिक स्थैर्याचे मार्ग असल्याचे अधोरेखित करण्यात आले.