भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून माहेरून १ लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीवारी २१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील माहेर असलेल्या रिता मुकेश सुतार यांचा विवाह २०१२ मध्ये रावेर तालुक्यातील मोरगाव येथील मुकेश गजानन सुतार यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत असताना, कालांतराने सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. पती मुकेश गजानन सुतार हा वारंवार दारूच्या नशेत घरी येऊन पीडितेस शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पतीने दारूच्या नशेत मारहाण केल्यानंतर सासरचे इतर सदस्य देखील त्याला समर्थन देत असत. “तुझ्या माहेरून १ लाख रुपये घेऊन ये” अशी मागणी करत सासरच्यांनी फिर्यादीला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत भुसावळ तालुक्यात पोलीसांत धाव घेवून विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार पती मुकेश गजानन सुतार, चुलत दीर ललित हेमराज सुतार, हर्षल निवृत्ती सुतार, चुलत सासू दुर्गाबाई हेमराज सुतार, चुलत सासरे हेमराज बाबुराव सुतार (सर्व रा. मोरगाव, ता. रावेर) आणि आते सासू पद्माबाई श्रीधर रुले (रा. साकळी, ता. यावल) अशा एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ महेश चौधरी हे करीत आहे.



